पुरुषप्रधान संस्कृतीच्या
बिन बुडाच्या
अवैचारिक भिंतींना
उध्वस्त करत
तिने इथल्या
खितपत पडलेल्या
समाज व्यवस्थेला
सुरुंग लावला
त्या
प्रत्येक रणरागिनिला
मानाचा मुजरा.
चुल आणि मूल
या जेरबंद समीकरणाचे
नियमच बदलून जिणे
मातीच्या
पोटात
नवीन विचार पेरला
त्या
प्रत्येक वीर मातेला सलाम.
सतीच्या
मती शून्य इतिहासाला
जिणे
कधीच न जुमानता
हाताला पंखाचे
स्वरुप देऊन
आभाळ। स्पर्श केला
त्या
प्रत्येक झेप घेणार्या
पावलांना वंदन.
ती
निघाली आहे आता
उंबरठ्याची चौकट तोडून
तिच्या अस्तित्वाच्या शोधात
ती
मारत आहे धडका
तिला इतक्या वर्ष
जखडून ठेवलेल्या
त्या मनुवादी रुढी परंपरेला.
तिने
वेठीस धरले आहे
इथल्या बरबटलेल्या
प्रत्येक मानवी सुर्याला
त्याचा हिशोब करून
ती उगवणारचं
नवीन परिवर्तनाची पहाट
आणि
ती आता
या गढूळ
वैचारिक डबक्यात
लाखो मलाला
जन्माला घातल्या शिवाय
थांबणार नाही.
सांग कशी थांबेल ती आता
कारण
तिच्या सोबत आहे ती
शिवबाची जिजाऊ
भिमाची रमाई
आणि
ज्योतीबाची सावित्री माई
तिच्या प्रत्येक विचारात
धगधगत
तिच्या सोबत
प्रत्येक परिवर्तनाच्या वाटेवर
आणि
प्रत्येक खडतर वळणावर.
🌹जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🌹
No comments:
Post a Comment